अबोल नाते…

नको अबोला नात्यात आता
की त्यास त्याची सवय व्हावी
अबोल भाषेतूनी एक आता
गोड शब्दाची माळं व्हावी

विसरून जावी ती रूसवी आठवण
भेटण्याची त्यास ओढ असावी
नको अंतर नात्यास आता
की त्यास आपूल्यांची आठवण व्हावी

पुन्हा भरुनी यावी नजरेची कडा
त्यात नात्यांची वीण घट्ट रहावी
ओघळत्या आश्रुसही पुन्हा आता
नव्याने साऱ्यांची ओळख पटावी

कुठे अंतरीची एक खंत बोलते
त्यास आपुल्यांची वाट दाखवून द्यावी
नको कोणती या मनी सल आता
जुनी जळमटे सारी निघुनी जावी

घट्ट मिठीत सारी विरून जाता
मुठीत ही नाती जपून ठेवावी
मनाच्या लहरीवर लिहून ठेवता
नाती आयुष्यभर सोबत राहावी

आठवणीच्या पडद्यावर आता
ही नाती सतत समोर दिसावी
तेव्हा अबोल भाषेतून एक आता
गोड शब्दांची माळ व्हावी…!!
✍ योगेश खजानदार